भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ शहरात खळबळ : उसनवारीच्या पैशांच्या वादातून “त्या” २१ वर्षीय तरुणाचा खून

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज ||उसनवारीच्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर) उघडकीस आली. खून केल्यानंतर मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर टाकण्यात आला होता. मात्र, बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत या खुनाचा छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेने भुसावळ शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

मयत तरुणाचे नाव भूषण उल्हास व्हावळे (वय २१, रा. गोपाळनगर, डी.एल. हिंदी हायस्कूलमागे, भुसावळ) असे आहे.

फार्म हाऊसवर नेऊन मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण व्हावळे याला संशयित आरोपींनी साक्री फाटा परिसरातील संजय दत्तू आवटे यांच्या फार्म हाऊसवर नेले होते. उसनवारीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून तेथे भूषणसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपींनी कोणत्यातरी हत्याराने भूषणवर गंभीर वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

खुनाची घटना उघडकीस येऊ नये आणि प्रकरण अंगाशी येऊ नये, यासाठी मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर आणून टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

तिघांविरोधात खुनाचा गुन्हा
याप्रकरणी मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावळे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात संजय दत्तू आवटे, प्रमोद बलराम लाहोरीया आणि रफिक मेमन ऊर्फ गुड्डू या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाला वेग देत संशयितांचा माग काढला. पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या संजय दत्तू आवटे आणि प्रमोद बलराम लाहोरीया यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तर रफिक मेमन ऊर्फ गुड्डू हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे.

अवघ्या दोन तासांत कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना अटक केल्याने तपासाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पथकात सहायक निरीक्षक राहुल तायडे, सहायक शत्रुघ्न पाटील, पोलिस उपनिरीक्षक मो. अली सैय्यद तसेच डी.बी. पथकातील हवालदार कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, जीवन कापडे, अशोक बाविस्कर आदींचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!