फैजपूर मध्ये सट्टा-बेटिंगचा धंदा जोरात, कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
फैजपूर.मंडे टु मंडे न्युज | फैजपूर शहरात सट्टा बेटिंगचा अवैध व्यवसाय सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फैजपूर शहरप्रमुख संदीप माळी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून, कारवाई न झाल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, फैजपूर शहरातील किरंगे वाडा परिसरातील तीन मजली इमारतीमध्ये सट्टा बेटिंगचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत या ठिकाणी सुमारे २० ते २५ जण आकड्यांची छाटणी करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.सदर सट्टा बेटिंग पिढीवर तातडीने कारवाई करून अवैध व्यवसाय बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, मुंबई, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर तसेच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.
आता पोलीस प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन संबंधित ठिकाणी चौकशी व कारवाई करणार का, याकडे फैजपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


