भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील बंडातील २०० कोटींची राख चोरी प्रकरणी एसआयटी स्थापन करा – ज्ञानेश्वर आमले
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क|भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील टाकाऊ राखबंडातील राख चोरी प्रकरणी एसआयटी स्थापन करा या मागणीसाठी ज्ञानेश्वर आमले यांनी उपोषण सुरू केले आहे.
प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरच्या राख बंडात निविदेपूर्व जवळपास ६२ लाख मेट्रिक टनापर्यंत राख शिल्लक होती. त्यांनतर सन २०२३ ते २०२५ पर्यंत केंद्रात जळालेल्या कोळश्याच्या प्रमाणात अधिकच्या टाकाऊ राखेची बंडात भर पडली. मे २०२५ मध्ये मिशिता टेक्नॉलॉजीस नांदेड यांचे मार्फत राख बंडात शिल्लक असलेला राखसाठा याबाबत सर्व्हे करण्यात आला. त्यात बंडात केवळ बारा लाख नऊ हजार नऊशे सदसष्ट इतकी राख शिल्लक असल्याचा थकबाकी अहवाल देण्यात आला. त्यानुसार बंडातून जवळपास अंदाजित दोनशे कोटी रुपयांची राख चोरी झाल्याचा संशय आहे.
सदरची राख चोरी होत असलेबाबत मी वेळोवेळी पुराव्यासह वस्तुनिष्ठ तक्रारी केल्या आहेत. मात्र तत्कालीन मुख्य अभियंता आव्हाड मोहन आणि प्रफुल्ल भदाणे यांनी राख ई-लिलाव प्रकिया प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना न करीत राख तस्कारांसाठी राख चोरीचे मार्ग सोपस्करपणे खुले करून दिले. यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे बाबत सेवा नियमांच्या अधीन राहून कारवाई होणे अपेक्षित आहे. यात त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करणे, सेवेतून बडतर्फी करणेची कारवाई व्हावी, यासोबत त्यांचे राख तस्करांशी असलेले संबंध यातून काही आर्थिक चिरीमिरी झाल्याचा संशय असल्याने त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची ईडी संचालनालया मार्फत चौकशी होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय राख बंडातील राख चोरीची व्याप्ती मोठी असल्याने याबाबतीत पोलीस अधीक्षक जळगाव यांचेकडे एस.आय. टी. स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.
या प्रक्रियेत गेल्या शुक्रवारी २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशगड मुंबई येथे प्रत्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मंडळाची भेट घेतली असता, मुख्य अभियंता प.व.सु. आणि स.अ. तसेच इतर व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर प्रकरणात सर्वाधिकार हे मुख्य अभियंता बी.टी.पी.एस. भुसावळ यांचेकडेच असल्याने त्यांचा सदर प्रकरणाशी दूरान्वयेही संबंध नाही अशी समजूत काढली. अशावेळी प्राथमिकदृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष सहभागीतेबाबत धूसरता मानून निष्पक्षपातीपणे वस्तुस्थिती अभ्यासून विषयांकित प्रस्ताव सादर करण्यात यावा. निवेदनाच्या प्रत्ती मुख्य व्यवस्थापकीय संचालक (महाजेनको) प्रकाशगड, मुंबई उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.

