शालार्थ आयडी घोटाळा : विनोद तराळ, मनोज पाटील, शरद शिंदे सह १२ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले; तिघांना दिलासा
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | राज्यभरात चर्चेत आलेल्या तब्बल १७० कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक रोड सत्र न्यायालयाने शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी १५ स्वतंत्र आदेश पारित केले. या प्रकरणातील संशयित संस्थाचालक शरद दयाराम शिंदे, मनोज रामकृष्ण पाटील, विनोद तराळ यांच्यासह एकूण १२ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. त्याच वेळी तीन संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून, एका अर्जावरील सुनावणीसाठी १० ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
नाशिक रोड सत्र न्यायालयात एकूण १९ संशयितांच्या जामीन अर्जांवर सुनावणी झाली. तपासाची व्याप्ती, प्रकरणातील कथित संघटित स्वरूपाचे गुन्हे आणि आर्थिक गैरव्यवहाराची गंभीरता लक्षात घेत न्यायालयाने १२ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले.
शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर न्यायालयाचे गंभीर भाष्य
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या गंभीर परिणामांवर कठोर शब्दांत भाष्य केले. शिक्षण क्षेत्रात खोलवर रुजलेला भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून त्याचा परिणाम समाजाच्या आणि भावी पिढीच्या भवितव्यावर होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
शाळा आणि शिक्षण संस्था या ज्ञानाची केंद्रे असताना तेथे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृती घडणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाकडे केवळ तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा म्हणून पाहता येणार नसून, सरकारी निधी आणि जनतेच्या पैशांच्या कथित गैरवापराची ही गंभीर बाब असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.या निर्णयामुळे शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून, उर्वरित संशयितांबाबत न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासाकडे आता लक्ष लागले आहे.


