रावेर मध्ये पोलिसांची मोठी कारवाई; ६०० किलो मांस जप्त, तीन गोवंशांची सुटका
रावेर.मंडे टु मंडे न्युज |रावेर तालुक्यातील आभोडा येथे गोमांस विक्रीविरोधात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी धडक कारवाई केली. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे ६०० किलो मांस, दोन कुऱ्हाडी आणि दोन सुरे जप्त केले. तसेच कत्तलीच्या उद्देशाने आठवडे बाजार परिसरात बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आभोडा गावातील बसस्थानक परिसरात एका घरात जनावरांची कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा) याच्या ताब्यातील घरात कत्तल करून मांस कापण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून सुमारे ३०० किलो मांस, एक कुऱ्हाड आणि एक सुरा जप्त केला.
दुसऱ्या ठिकाणीही छापा
यानंतर मिळालेल्या अन्य गुप्त माहितीनुसार पोलिसांनी आभोडा गावातील चावडी परिसरात दुसऱ्या ठिकाणी कारवाई केली. येथे इरफान रेहमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा कत्तल करून मांस विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित घटनास्थळावरून पसार झाला. या कारवाईत सुमारे ३०० किलो मांस, एक कुऱ्हाड आणि एक सुरा जप्त करण्यात आला.
दरम्यान, दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या मांसाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत नमुने घेण्यात आले. त्यानंतर जप्त मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.बीया कारवाईमुळे आभोडा परिसरात खळबळ उडाली असून, रावेर पोलिसांनी त्यांच्या हद्दीत कुठेही गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याचे किंवा कत्तल होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील हवालदार ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, राहुल परदेशी, विकार शेख, कॉन्स्टेबल उषा मसाणे आदींनी केली.


