मिशन RISE अंतर्गत सावदा येथे अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम; व्यसनमुक्तीबाबत जनजागृती
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्यूज | जळगाव जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी ‘मिशन RISE’ अंतर्गत सावदा शहरात व्यसनमुक्ती व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत सावदा येथील जेहरा मॅरेज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला सावदा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, मुक्ताईनगर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगावचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांना प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त व सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांची भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमात जळगाव जिल्हा पोलिसांची अमली पदार्थांविरोधातील धडक मोहीम आणि सामूहिक लढा या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास जेहरा हॉलचे हाजी अख्तर इमदाद अली उर्फ बाबू शेठ, सूत्रसंचालक संजय महाजन सर, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप तसेच सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय सावदा नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, हद्दीतील पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले.


