जळगावच्या बँक दरोड्याचा धक्कादायक उलगडा! १६ लॉकर फोडणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड बडतर्फ PSI
भोकर येथील SBI शाखेतील दरोड्याचे गूढ उकलले; तुरुंगातील ओळखीतून कटाची आखणी, चौघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेतील तब्बल १६ लॉकर फोडून सोने आणि रोकड लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शंकर जासक हा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या जासकने कारागृहात असतानाच या नव्या गुन्ह्याची आखणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, लुटलेल्या मुद्देमालापैकी काही ऐवज जप्त करण्यात आला आहे.
२०२३ मधील दरोड्याच्या गुन्ह्यातही सहभाग
शंकर जासक याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बँकेतून सुमारे ३.१७ कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात अटकेत असताना तो जळगाव मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला होता.
कारागृहात असतानाच त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली. पवार हा २०२४ मध्ये चाळीसगाव परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणात कारागृहात होता. तोही काही काळापूर्वी जामिनावर बाहेर आला. कारागृहातील या ओळखीचे रूपांतर पुढे गुन्हेगारी कटात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बँकेत ४० ते ४५ मिनिटे दहशत
भोकर येथील SBI शाखेत दरोड्याच्या दिवशी शंकर जासक आणि गजानन पवार यांच्यासह चार जणांनी प्रवेश केला. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावले. बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला लक्ष्य करून आरोपींनी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडण्यात आले. लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा मोठ्या बॅगांमध्ये भरून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे ४० ते ४५ मिनिटे बँकेत दहशतीचे वातावरण होते.
ग्रामस्थांचा पाठलाग; चार बॅगा रस्त्यात फेकल्या
दरोडा टाकल्यानंतर आरोपी धरणगावच्या दिशेने पळत असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. ग्रामस्थांचा पाठलाग आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे आरोपींची धावपळ उडाली.
या गोंधळात आरोपींनी चावलखेडा परिसरानजीक चार बॅगा रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती समोर आली. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी विशेष पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
शेतात लपलेल्या मुख्य आरोपींना अटक
पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केल्यानंतर शंकर जासक आणि गजानन पवार हे दोघे एका शेतात लपून बसल्याचे आढळले. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असलेल्या बॅगा जप्त केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एकूण किती रकमेचा आणि सोन्याचा ऐवज लुटण्यात आला, तसेच किती मुद्देमाल हस्तगत झाला, याबाबत तपासातून अधिक स्पष्टता येणे बाकी आहे.
टोळीचे इतर गुन्हेही उघड होणार?
या दरोड्यामागे नेमके कोणते नियोजन होते, आरोपींना बँकेतील लॉकर आणि सुरक्षाव्यवस्थेची माहिती कशी मिळाली, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासली जात आहे.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीनेच या दरोड्याचे नेतृत्व केल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या टोळीचे आणखी गुन्हे उघड होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

