सावदा येथे सिद्ध पादुका दर्शन सोहळा : भक्तिमय वातावरणात कार्यक्रम, शोभायात्रेचे होते आकर्षण
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा सावदा येथे मोठ्या भक्तिभावात पार पडला. श्रद्धा, सेवा आणि समाजोपयोगी उपक्रमांची त्रिवेणी असलेल्या या सोहळ्यात सुमारे १० हजार भाविकांनी सहभाग घेतला होता.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचे अध्यात्मिक व सांप्रदायिक कार्य मोठे आहे. आज देशभरात त्यांचे शिष्य व भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. महाराजांच्या प्रेरणेने त्यांच्या “तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा” या ब्रीद वाक्याने प्रेरीत होवुन त्यांच्या भक्तांनीbसमाजातील सर्वसामान्य घटकातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. समाजातील गरजू घटकांना
त्यांच्या पायावर उभे राहण्याची मदतीचा हात तथा प्रेरणा देण्याचे काम हे केवळ महाराजांच्या प्रेरणेने होत असून त्यांच्यामुळे लाखो नागरिकांचे आयुष्य बदलले असल्याचे मत यावल तालुक्याचे आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. ते सावदा येथे आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
प्रसंगी सावदा येथील प्रजापिता ब्राम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका वैशाली दिदी, रावेर चे माजी आमदार अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, माजी नगराध्यक्ष रावेर पद्माकर महाजन, सावदा शहरातील नवविर्वाचित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेणुका पाटील, आदी उपस्थित होते.
सकाळी १० वाजेला दुर्गादेवी मंदिरापासून सावदा शहरातील प्रमुख मार्गाने प्रभू रामाच्या गजरात पादुकांच्या शोभायात्रेने सोहळ्याची सुरुवात झाली. शोभायात्रेत मुख्य चौकात परिसरातील नागरिकांनी पादुकांचे पूजन तसेच पुष्प पाकळ्याचा वर्षाव करण्यात आला. भाविक
जयघोष करत, नाचत, गात पादुका संतपीठाजवळ घेऊन गेले. पूजेचे यजमान यांनी संतपीठाजवळ मंत्रघोषात पादुकांचे पूजन केले. त्यानंतर पादुका संतपीठावर विराजमान झाल्या. स्वागत आरतीने मुख्य कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
संस्थानमार्फत चालणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यामध्ये रक्तदान शिबिरे, २४ तास मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान, अवयवदान, मोफत शाळा, ड्रायव्हिंग स्कूल, ब्लड इन नीड बिन यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निवडलेल्या भाग्यवंत जोडप्यांना पादुकांचे पूजन करण्याचा मान मिळाला. त्यानंतर हजारो सपत्नीक भक्तांनी सामूहिक पूजन केले.परिसरात भक्तीची ऊर्जा अनुभवता आली. यशस्वितेसाठी जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती, संग्रामसैनिक, युवा सेना, महिला सेना, शिष्य भक्तगण, उपासक, कार्यवाहक, संतसंग समित्या आणि प्रवचनकार यांनी मेहनत घेतली.

