भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावधुळे

पशू खाद्याच्या आड विदेशी दारूची तस्करी; २०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, चोपड्यात होणार होता मद्यसाठा

जळगाव. मंडे टु मंडे न्युज || पशू खाद्याच्या आड लपवून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान चौफुली येथे करण्यात आलेल्या या कारवाईत १० लाख ५० हजार ३२० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा आणि १० लाख रुपये किमतीचा कंटेनर, असा एकूण २० लाख ५० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहाडी नगर पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शानेश्वर वारे यांना गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अवधान चौफुली येथे सापळा रचला. संशयित कंटेनर (एमएच १४ जीयू ५५५३) तेथे येताच पोलिसांनी त्याची तपासणी केली. यावेळी कंटेनरमध्ये पशू खाद्याच्या आड विदेशी दारूचा मोठा साठा लपवून नेला जात असल्याचे आढळून आले.

चोपड्यात होणार होता मद्यसाठ्याचा पुरवठा
पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल सुरेश ठाणगे (रा. श्रीरामपूर) याने हा मद्यसाठा कंटेनरमध्ये भरला होता. कंटेनर चालक विजय सुरेश ठाणगे (४२, रा. वॉर्ड क्रमांक १, दशमेशनगर, श्रीरामपूर) आणि क्लीनर इसाक नूर शेख (३६, रा. वॉर्ड क्रमांक १, दशमेशनगर, श्रीरामपूर) यांच्या माध्यमातून हा साठा चोपडा येथील बापू वाणी उर्फ विनोद वसंत देशमुख याच्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा
कारवाईदरम्यान पोलिसांनी गोवा बनावटीची विदेशी दारू, विविध कंपन्यांचा मद्यसाठा, पशू खाद्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ५० हजार ३२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी मोहाडी नगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मद्यसाठा नेमका कुठून आणण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक दीपक ढोके, अंमलदार शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संदीप पाटील, सतीश जाधव, मच्छिंद्र पाटील, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, राजीव गीते आदींच्या पथकाने केली.

जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यातील बहुतांश दारू गोवा राज्यात निर्मित असून, ती केवळ गोव्यात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा साठा महाराष्ट्रात कसा पोहोचला, यासह या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!