दिवाळीसाठी विशेष रेल्वेची घोषणा; चाळीसगाव,पाचोरा,भुसावळला थांबा,आणखी कुठे कुठे थांबे? जळगाव स्थानकावर मात्र थांबा नाही; ६ विशेष सेवा
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || आगामी दिवाळी आणि छठपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते हटिया दरम्यान विशेष साप्ताहिक उत्सव गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर एकूण सहा विशेष सेवा धावणार असून, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. मात्र, जळगाव स्थानकावर या विशेष गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.
एलटीटी–हटिया विशेष गाडी
गाडी क्रमांक ०८६१० लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया ही साप्ताहिक विशेष गाडी १३ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दर मंगळवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता हटिया येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत.
हटिया–एलटीटी विशेष गाडी
गाडी क्रमांक ०८६०९ हटिया–लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष साप्ताहिक गाडी १२ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दर सोमवारी धावेल. हटिया येथून दुपारी ४.२० वाजता सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
या स्थानकांवर थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, बानो, गोबिंदपूर रोड आणि बालसीरिंग या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेण्यासाठी चाळीसगाव, पाचोरा किंवा भुसावळ स्थानकावरून प्रवास करता येणार आहे.
दिवाळी आणि छठपूजा काळातील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता या विशेष सेवेमुळे उत्तर व मध्य भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

