अंतुर्ली व परिसरात खुलेआम अवैध धंदे? सट्टा, पत्त्यांचे क्लब, दारू विक्री, आशीर्वाद कोणाचा?
मुक्ताईनगर | मंडे टु मंडे न्यूज. अक्षय काठोके || मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व परिसरात विविध प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सट्टा, पत्त्यांचे क्लब, कॅसिनोप्रकारचे खेळ, तसेच दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.
अंतुर्ली परिसरात गावठी हातभट्टीची दारू, गांजा तसेच विनापरवाना देशी दारूची विक्री काही टपऱ्या व हॉटेलच्या माध्यमातून राजरोस पणे सुरू आहेत.
गावाच्या चारही बाजूंना पत्त्यांचे मोठे क्लब सुरू आहेत. धामणदे आणि पिंप्रीनांदू परिसरातही अशा प्रकारचे अड्डे सुरू आहेत.
या अवैध धंद्यांमध्ये स्थानिकांसह बुऱ्हाणपूर, भुसावळ, मुक्ताईनगर तसेच वारोली परिसरातील काही व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, या सर्व अवैध धंद्यांना पोलिस प्रशासनाचा आशीर्वाद आहे का? असा सवाल नागरिक करीत आहेत.
दारूमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात
गावठी दारूमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली. हातभट्टीच्या दारूमध्ये घातक रसायनांचा वापर होत असल्याचा आरोपही केला जात असून, त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दारू पिणाऱ्या अनेकांच्या हातापायावर सूज, पोट फुगणे, लिव्हर,किडनी खराब होऊन मरणयातना भोगत काही मरणही पावले आहेत. दारूच्या व्यसनामुळे काही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, संसार उद्ध्वस्त झाल्याचेही ग्रामस्थ सांगतात.
पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल
एकीकडे संबंधित विभागांकडून कारवाई होत असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “या अवैध धंद्यांना पोलिस प्रशासनाकडूनच अभय मिळत आहे का?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


