सुनसगावात भटक्या कुत्र्याचा हल्ला ; वृद्ध महिला जखमी
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | तालुक्यातील सुनसगाव येथे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे आणखी एक गंभीर घटना घडली आहे. श्री खंडेराव मंदिर परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली.
गावातील रहिवासी चंद्रभागाबाई चावदस पाटील (वय ७६) या आपल्या घराजवळ जात असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने मागून हल्ला करत त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर चावा घेतला. कुत्र्याने दोन ते तीन वेळा चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, सुनसगावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गल्लोगल्ली कुत्र्यांचे थवे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
