थोरगव्हाण ग्रामस्थांचा उत्साह — कालभैरव जयंतीचा जल्लोष!
थोरगव्हाण, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज. संतोष राणे सर | दरवर्षी कार्तिक कृष्ण अष्टमीला म्हणजेच कालभैरव जयंतीला रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील कालभैरवनाथ मंदिरात श्रींच्या मुकुटाची विधिवत स्थापना केली जाते, तर माघ पौर्णिमेला जय भैरवनाथ मंदिरात मुकुट स्थापना होते. त्यामुळे दरवर्षी दोन वेळा थोरगव्हाणमध्ये भैरवनाथाच्या मुकुटस्थापनेचा उत्सव साजरा केला जातो.

काशी, उज्जैन, रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि थोरगव्हाण येथील कालभैरवनाथ मंदिर ही भारतातील प्रसिद्ध, जागृत भैरवपीठे मानली जातात. श्री स्वामी समर्थ पीठ त्र्यंबकेश्वर चे प्रमुख श्री अण्णासाहेब मोरे यांनी सुद्धा त्यांच्या “हितगुज” मध्ये थोरगव्हाण येथील कालभैरवनाथ मंदिराचा विशेष उल्लेख केलेला आहे.

थोरगव्हाण गावात भैरवाची दोन पीठे आहेत —
१) श्री कालभैरवनाथ मंदिर, गाव हाळाजवळ स्थित
२) जय भैरवनाथ मंदिर, गावातील मध्यवर्ती ठिकाणी. कालभैरव हे ग्रह-नक्षत्रांचे अधिपती, इंद्रादि देव ज्यांची सेवा करतात असे दैवत मानले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त १२ नोव्हेंबर रोजी रावेर तालुक्यातील थोरगव्हाणमध्ये भव्य मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची मिरवणूक थोरगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयापासून वाजतगाजत, भक्तिभावाने संपूर्ण गावात प्रदक्षिणा करीत मुख्य मंदिरात पोहोचते, जिथे मुकुटाची विधिवत स्थापना केली जाते.
यानंतर श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार तर्फे भैरव-चंडी सेवा सादर केली जाते. कालभैरवनाथाच्या दर्शनाने व कालभैरवाष्टक तसेच भैरव सहस्रनाम पठणाने अनेकांना शत्रूंच्या त्रासातून मुक्ती, कोर्टकचेरीतील यश, राजकारणात प्रगती, आर्थिक स्थैर्य असा लाभ झाल्याचा अनुभव आहे.
मुकुटस्थापनेनंतर जय भैरवनाथ मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे अन्नदाते श्री ललित विश्वनाथ पाटील व श्री आशिष विश्वनाथ पाटील (हल्ली मुक्काम – जळगाव) असून, पारंपारिक मेनूमध्ये शिरा आणि इतर पदार्थांचा समावेश असेल. तसेच अमेरिकास्थित एका भाविकांकडून दरवर्षी सव्वा क्विंटल मोतीचूर लाडू वाटपाची परंपरा या वर्षीही सुरू राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी, मुख्य मंदिराजवळ श्री सुधाकर वामन चौधरी (मुळगाव – लहान वाघोदा, हल्ली मुक्काम – कळवा, ठाणे) यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.
मुकुट १२ नोव्हेंबर रोजी दिवसभर स्थापन राहील व १३ नोव्हेंबर दुपारी विधिवतपणे मूळ स्थानी परत ठेवण्यात येईल.एक वर्षानंतर होणारी ही मुकुट स्थापना गावकऱ्यांसाठी अत्यंत श्रद्धा आणि उत्साहाचा दिवस असतो.
थोरगव्हाण ग्रामस्थ व कालभैरव ट्रस्ट यांच्या वतीने सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की, या पवित्र दिवशी श्री कालभैरवनाथ महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा…..जय कालभैरवनाथ! जय श्री स्वामी समर्थ!…
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
