भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

सावदा. ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज | रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या इको कारमधून सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड, पाकीट व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी सावदा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. आरोपीं कडून चोरीस गेलेले पाकीट, कागदपत्रे, रिकामी सॅक आणि लेडीज पर्स जप्त करण्यात आली असून रोख रकमेचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता भुसावळ येथील शेख समीर शेख दगडू (वय 25) हे मित्र-मैत्रिणींसह इको कार (क्र. MH-02 CH-8499) घेऊन गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. वाहनाचा हप्ता भरण्यासाठी जमा केलेली 1.50 लाख रुपयांची रोकड त्यांनी बॅगेत ठेवून ती कारच्या डिकीत ठेवली होती. कारचे दरवाजे लॉक असले तरी डिकीला लॉक नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोकड, पाकीट तसेच इतर पर्स व साहित्य लंपास केले.या प्रकरणी 20 जुलै 2026 रोजी सावदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


तपासादरम्यान फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गारबर्डी धरण परिसरात संशयितांचा शोध घेतला. फिर्यादीने ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी राजू रज्जाक तडवी (31, रा. खिरोदा), शरीफ वजीर तडवी (25, रा. चिचाटी) आणि अकिल उस्मान तडवी (31, रा. लोहारा) या तिघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष झडतीदरम्यान शरीफ तडवी याच्याकडून फिर्यादीचे पाकीट तसेच आधार कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आरसी बुक व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.


आरोपींना न्यायालयात हजर केले असता 23 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत आरोपींच्या सांगण्यावरून चोरीतील रिकामी सॅक व एक लेडीज पर्स जप्त करण्यात आली असून चोरीच्या रोख रकमेची विल्हेवाट कुठे लावली याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश फड व त्यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!