भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

nashirabad

नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोनवणे यांची बदली करा ; पाच वर्षांच्या कार्यकाळातील चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ .दीपक लोखंडे |
नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. आर. आर. सोनवणे यांची तात्काळ बदली करून ठेकेदार व मुख्याधिकारी यांच्यात जवळचे संबंध असून कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे दिली जाणार असून त्यांच्या मागील कार्यकाळातील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्ता प्रदीप साळी यांनी केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, श्री. सोनवणे हे २२ मार्च २०२२ पासून नशिराबाद नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून, शासनाच्या नियमानुसार साधारण तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांची बदली झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रार अर्जात मागील काही वर्षांपासून नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट एकाच ठेकेदाराला दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार व मुख्याधिकारी यांच्यात जवळचे संबंध असून कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे दिली जात असल्याची गावात चर्चा असल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र या आरोपांबाबत कोणताही अधिकृत पुरावा तक्रारीसोबत सादर करण्यात आलेला नसल्याचे समजते.

तसेच घनकचरा व्यवस्थापनातील कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य, पीएफची माहिती, वेतन पावत्या आदी सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील वर्षी सफाई कामगार विशाल चिरावंडे यांचा काम करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधीच्या वितरणात अनियमितता झाल्याचा तसेच संबंधित लाभार्थ्यांना वेळेवर निधी मिळत नसल्याचाही आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय, नशिराबाद शहरात मागील काही वर्षांपासून आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गावासाठी मंजूर असलेली सुमारे ५७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना निर्धारित मुदतीत पूर्ण झालेली नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी तक्रारदारांशी अर्वाच्य भाषेत वागतात, तसेच तक्रार करणाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे. तसेच ते नशिराबाद येथे वास्तव्यास नसतानाही घरभाडे भत्ता घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून संबंधित मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, तसेच त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. या संदर्भातील माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कार्यकाळाच्या माहितीची प्रतही अर्जासोबत जोडण्यात आली आहे.दरम्यान, या तक्रारीची प्रत नगरविकास मंत्री, जळगावचे पालकमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!