“आम्हाला सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा” पाटील कुटुंबीयांचे भावनिक आवाहन.. स्मशान भूमीतून अस्थींची चोरी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक धक्कादायक तेव्हढीच संतापजनक घटना जळगाव शहरातून उघडकीस आली. शहरातील मेहरूण येथील स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी अज्ञात चोरट्यांनी चक्क एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेली माहिती अशी की, गायत्री नगर येथील रहिवासी छबाबाई काशिनाथ पाटील यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अंतिम संस्कारापूर्वी काढण्यात आले नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघड झाला. चोरट्यांनी विशेषतः छबाबाई पाटील यांच्या डोक्याच्या, हाताच्या आणि पायाच्या अस्थी चोरल्या आहेत. अस्थींवर शिल्लक राहिलेले सोन्याचे दागिने मिळवण्यासाठीच अस्थी चोरण्यात आल्याचा स्पष्ट आरोप पाटील परिवाराने केला आहे.
या धक्कादायक घटनेमुळे पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर आणि स्मशानभूमीतील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जळगांवचे आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेच्या सुरक्षेवर ताशेरे ओढत या शहरात मेलेल्या नागरिकांची अस्थी देखील सुरक्षित नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ‘आम्हाला सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,’ असे भावनिक आवाहन पाटील कुटुंबियांनी केले आहे. या संतापजनक कृत्या बाबत पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी, चोरट्यांना शोधणे महत्त्वाचे आहे.


