भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर? अमित शहा यांचे संकेत

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या तीन दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौर्‍यात त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याची शक्यता तपासण्याच्या सूचना शाह यांनी दिल्याचे समजते.

महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. चार महिन्याच्या आत राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यासाठी सर्व पक्षाने कंबर कसली आहे. सत्ताधारी असणाऱ्या भाजपकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या प्रमुख महापालिकेसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपकडून या महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्याने राज्याच्या राजकारणात या बाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, अमित शाह हे दौऱ्यावर असताना मुंबईत मंगळवार रोजी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
‘सह्याद्री’ अतिथिगृहावर त्यांची भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी मुंबईतील १०७ प्रभागात आपल्याकडे उमेदवार असल्याचे शहांना सांगितले. मुंबईत २२७ प्रभाग असून त्यांनी १०७ जागांची मागणी अमित शहा यांच्या कडे केल्याची माहिती मिळत असून शाह यांनी शिंदे यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचे सांगण्यात आले.

या भेटीत राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. मात्र यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो मुंबई महापालिका निवडणुकीचा.

मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याची परिस्थिती आणि त्यातून यश मिळण्याची शक्यता किती, याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

शिवसेना-भाजपच्या मागील निवडणूक युतीचे चित्र
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्याचे राजकीय चित्र वेगळे आहे. शिवसेना दोन गटांत विभागली असून, भाजपची मात्र  संघटनात्मक ताकद आणि विस्तार अधिक वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!