खळबळजनक : अश्लील व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक!
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | यावल येथील ६० वर्षीय वृद्धाला सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तब्बल ९ लाख रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नागरिकांना लैंगिक शोषणाचे व्हिडीओ पाठविल्याचा आरोप करत तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होण्याची भीती दाखवत ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी यावल येथील राजेश बाळकृष्ण यावलकर (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावलकर यांना ३० मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच मुंबई क्राईम ब्रँचकडून यावलकर यांच्या नावावर असलेल्या एका सीमकार्डाबाबत नोटीस प्राप्त झाल्याचे सांगून कॉल कट केला.
त्यानंतर ३ एप्रिल रोजी पुन्हा यावलकर यांना कॉल करण्यात आला. त्यांच्या नावावर मुंबई येथे एका मोबाईल कंपनीचे सीमकार्ड काढण्यात आल्याचे सांगत, त्या क्रमांकावरून मुंबईतील नागरिकांना लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर कॉल मुंबई क्राईम ब्रँचकडे फॉरवर्ड केल्याचे भासवून यावलकर यांना आणखी भीती दाखवण्यात आली. एका नामवंत विमान कंपनीच्या संस्थापकाकडे त्यांचे एटीएम कार्ड सापडले असून, त्याचा वापर करून मनी लाँड्रिंग करण्यात आले आणि परदेशात पैसे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अन्य एका दिग्गज व्यक्तीचे नाव घेत त्यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून तब्बल २० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगून यावलकर यांना मानसिक दबावाखाली आणण्यात आले.
अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी
या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या यावलकर यांनी समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून ९ लाख रुपये पाठविण्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी पाठविलेली रक्कम चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगून ती रक्कम परत मिळवून दुसऱ्या खात्यात पाठविण्यास सांगण्यात आले. यानंतर यावलकर बँकेत गेले असता, बँक अधिकाऱ्याने त्यांच्याशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


