भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने तरुणाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी, दुचाकीचे दोन तुकडे, यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील सावखेडा सीम गायरान रस्त्यावर असलेल्या निंबादेवी धरणाजवळ आज रोजी संध्याकाळी निंबादेवी धरण पाहून आपल्या गावाकडे परतत असताना साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात १७ वर्षीय विजय शिवा भिल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अकलूज येथील विजय शिवा भिल (वय १७), कृष्णा गजानन पवार (दोन्ही रा. अकलूद) आणि मयूर सुधाकर सोनवणे (वय २१, रा. वाघळूद, ता. यावल) हे तिघे मित्र एकाच शाईन दुचाकीने निंबादेवी धरण पाहण्यासाठी गेले होते. ते निंबादेवी धरण पाहून संध्याकाळी आपल्या घरी यावल तालुक्यातील अकलूद येथे परतत असताना, सावखेडा सीम गायरान रस्त्यावरील एका वळणावर त्यांच्या मोटरसायकल वरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. या भीषण अपघाताची तीव्रता इतकी होती की, मोटारसायकलचे दोन तुकडे झाले. यामध्ये विजय शिवा भिल याचा जागीच मृत्यू झाला.
त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयूर सुधाकर सोनवणे आणि कृष्णा गजानन पवार यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले आहे. या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
