डी.एन, महाविद्यालय; प्राचार्य निवड प्रक्रिया बेकायदेशीर, चौकशीची मागणी– गजानन मालपुरे
जळगाव (प्रतिनिधी)। संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना या काळात निवडप्रक्रिया बंद असताना सुद्धा फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड करतांना, शासनाने विहीत कलेल्या प्राचार्य निवड प्रक्रीया संपूर्णपणे डावलण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका तक्रारी ‘ई-मेल’द्वारे केली आहे.
कोरोना संसर्ग च्या महामारी मुळे सर्वत्र लाकडाऊन असताना शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील सर्व ठिकाणच्या मुलाखती रद्द केलेल्या असताना, तसेच काही महाविद्यालयातील जाहिराती आधी मंजुर असतांना सुद्धा निवड प्रक्रियेसाठी समिती नेमू न देता सपूर्ण प्रक्रिया बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. असे असतांना सुद्धा फक्त धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर या महाविद्यालयासाठी प्राचार्य निवडीसाठी असलेले सर्व नियम डावलून लॉकडाऊन असतांना विशिष्ट व खास मर्जीतील कर्मचाऱ्यांना विद्यापीठात अतिशय तडकाफडकी बोलावून व इतर संस्थांना डावलून फक्त धनाजी नाना महविद्यालयासाठी समितीची निवड करण्यात आली.
या काळात सर्व मुलाखती रद्द झालेल्या असतांना, प्राचार्य पी. आर. चौधरी हे दि. ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम डावलून, कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील, प्र. कुलगुरु प्रा. पी. पी. माहूलीकर, व प्र. कुलसचिव प्रा.बी. व्ही. पवार यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व नियम व प्रकिया डावलून इतर कोणालाही मुलाखत पत्र न पाठविता, मर्जीतील प्रा. पी. आर. चौधरी यांना प्राचार्य पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले असे मालपुरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच सदरची निवड प्रक्रिया ही प्रथमदर्शनीच सदोष दिसून येत असून, याची सखोल चौकशी होवून संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी. शिक्षण क्षेत्रात अशा मार्गाने भरती व्हायला लागली तर अनेक विद्यार्थांचे नुकसान होवून, चांगल्या गुरुजनांच्या पासून विद्यार्थी वंचीत राहतील. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य प्रक्रिया राबवून, डावलल्या गेलेल्या सदस्यांना न्याय द्यावा, असे मालपुरे यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत याना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


