जामनेर तालुक्यात कोम्बिंग ऑपरेशन मध्ये १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी, ५२ दुचाकींसह रिक्षा जप्त
जामनेर.मंडे टु मंडे न्युज| आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जामनेर तालुक्यात पोलिसांनी मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत रेकॉर्डवरील संशयितांची झाडाझडती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी १८९ रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी केली. दारूबंदी कायद्यान्वये १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ५२ दुचाकी आणि एका रिक्षेसह एकूण वाहने ताब्यात घेण्यात आली. याशिवाय अजामीनपात्र वॉरंट व नोटिसांचीही अंमलबजावणी करण्यात आली.
५२ दुचाकींसह रिक्षा ताब्यात
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान संशयास्पद आढळलेल्या ५२ मोटारसायकली आणि एका रिक्षेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनांची कागदपत्रे व अन्य बाबींची तपासणी करण्यात आली असून, वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाकडून पडताळण्यात येत आहे. तपासणीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत
जामनेर हद्दीत ७२ रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी करण्यात आली. तसेच एका हद्दपार व्यक्तीची तपासणी करून एका हद्दपार नोटीसची बजावणी करण्यात आली. या कारवाईत १० दुचाकी व एका रिक्षेसह वाहने ताब्यात घेण्यात आली, तर दारूबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले.
पहूर हद्दीतही मोठी कारवाई
पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६४ संशयितांची तपासणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये १० गुन्हे दाखल करण्यात आले असून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. याशिवाय ४ अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.
फत्तेपूर हद्दीत २२ दुचाकी जप्त
फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पोलिसांनी कारवाई करत संशयितांची तपासणी केली. यावेळी एका हद्दपार नोटीसची बजावणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच एका अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.
गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात कारवाई सुरूच राहणार
आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे हा या कारवाईचा उद्देश आहे. अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिले, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, सहायक निरीक्षक स्वप्नील शिंदे, फत्तेपूरचे सहायक निरीक्षक अंकुश जाधव, पहूरचे सहायक निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह १७ अधिकारी, १५० पोलीस अंमलदार आणि चार आरसीपी पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला.


