भूमि अभिलेख उप अधीक्षकाला लाच प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा
नाशिक.मंडे टु मंडे न्युज | चिंचवे येथील शेतगटाच्या एकत्रीकरण योजनेतील नकाशामधील चुकीची नोंद दुरुस्त करून पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देवळा येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या तत्कालीन उपअधीक्षकाला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
आरोपी सुरेश पर्वत वेताळ, तत्कालीन उपअधीक्षक, भूमिअभिलेख, वर्ग-२, देवळा यांच्याविरुद्ध ३० मार्च २०१२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदाराच्या शेतगटाच्या नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी वेताळ यांनी शासकीय पंचासमक्ष ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम देवळा येथील भूमिअभिलेख कार्यालयातील त्यांच्या दालनात स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी देवळा पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर १४ मार्च २०१४ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची स्पेशल केस क्रमांक ०३/२०१४ अशी होती.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथारे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी सुरेश पर्वत वेताळ यांना दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत २ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, तसेच कलम १३(२) अंतर्गत ३ वर्षे कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता विजय गायकवाड व शिरीष कडवे यांनी काम पाहिले.
या प्रकरणाच्या कामकाजासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, तसेच पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी काम पाहिले.


