७२ तास पावसाचा इशारा! अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार सरी ; धो धो पाऊस कोसळणार, २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | राज्यात जुलै अखेर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला असून, पुढील ७२ तास महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये १८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक व घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अहमदनगरमध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रात घाटभाग सतर्क पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज, तर कोल्हापूर घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातही पावसाची हजेरी अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये तुलनेने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.नागरिकांनी घ्यावी खबरदारी पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीकाठ, सखल भाग आणि घाट परिसरात विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

