भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ९ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमीं

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शहरातील नारायणनगर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी पहाटे शाळेसाठी घराबाहेर पडलेल्या ९ वर्षीय मुलावर कुत्र्यांच्या टोळीने भीषण हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर व नाकावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला सुमारे ८० टाके घालावे लागले आहेत.

जखमी विद्यार्थी तारकेश विशाल झोपे याच्यावर जळगाव येथील शिल्प हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता असल्याचे सांगितले असून त्यासाठी सुमारे १.५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या घटनेमुळे मुलासह कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ते अधिक आक्रमक बनत आहेत. भिमड कॉलनी, नारायणनगर, रिंगरोड, गणेश कॉलनी आदी भागांत कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला व वृद्ध यांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी गणेश कॉलनीत एका वृद्धालाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती.

नागरिकांनी नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शहरातील वाढते घाण व कचऱ्याचे ढिगारे यामुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळत असून त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीत मोकाटy कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, भुसावळ नगरपालिकेकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पावले उचलून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!