भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

चालकांना मराठी भाषेचे ‘व्यावहारिक ज्ञान’ असणे बंधनकारक, आता सर्वच प्रवासी वाहनांसाठी मराठीची सक्ती

मुंबई, मंडे टु मंडे न्युज. नेटवर्क | राज्यातील ऑटो रिक्षा, टॅक्सी,ओला,उबर, इ बाईक तसेच इतर सर्व सार्वजनिक वाहतूक वाहनांचे परवाने घेण्यासाठी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा मसुदा तयार केला असून, चालकांना मराठी भाषेचे ‘व्यावहारिक ज्ञान’ असणे बंधनकारक करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि इतर सर्वच व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ‘व्यावहारिक ज्ञान’ (Working Knowledge) बंधनकारक करण्याचा महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो आणि इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांसाठी हे लागू असेल. व्यावहारिक ज्ञान म्हणजे चालकाला मराठी बोलता, समजता आणि वाचता येणे आवश्यक आहे. तसेच नवीन परवाना (License) किंवा परवान्याचे नूतनीकरण (Renewal) करताना मराठी भाषेच्या ज्ञानाची पडताळणी केली जाईल. मात्र नियम न पाळल्यास परवाने रद्द केले जाऊ शकतात.

राज्य परिवहन आयुक्तांनी हा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला असून, मसुदा अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रस्तावित बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना अर्जदाराच्या पार्श्वभूमीसह मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान तपासण्याचा अधिकार परवाना प्राधिकरणाला असेल. याआधी सहा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेल्या वाहनांसाठी मराठी अनिवार्य होते, तर नव्या तरतुदीनुसार सहापेक्षा कमी प्रवासी क्षमता असलेल्या वाहनांसाठीदेखील हा नियम अनिवार्य करण्यात येणार आहे.

हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू
नियमावलीचा मसुदा जाहीर झाल्यावर नागरिक, संघटना आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येतील.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा शासन विचार करणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळून प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक भाषेचा आदर राखला जावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अमराठी चालकांसाठी या संदर्भात विशेष मोहीम राबवून मराठी शिकण्याची मदतही केली जाणार आहे.

मुख्य तरतुदी
सार्वजनिक सेवा वाहन परवाना देताना मराठीचे व्यावहारिक ज्ञान तपासले जाईल.

मीटर असलेल्या मोटार कॅबसाठी अतिरिक्त अटींमध्ये मराठी अनिवार्य.

ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणावेळी मराठी भाषेचे ज्ञान दाखवणे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!