तुकाराम मुंडेंचं अपहरण …५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक धक्कादायक घटना समोर आली असून ५ कोटी रुपयांच्या खंडणी साठी तुकाराम मुंडे यांचे अपहरण करण्यात आले. या अपहरणाचा मोठा थरार पहायला मिळाला.
तुकाराम मुंडे यांना बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून अपहरण करण्यात आले. यानंतर या व्यक्तीची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सुटका झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपहरणाची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंडे ४ जून रोजी दुपारी काम आटोपून घरी परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी मुंडे यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (LCB) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांचे जाळे चहूबाजूंनी पसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर, अपहरणकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जवळील धोत्रा गावाजवळ तुकाराम मुंडे यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना रस्त्यावर सोडून दिले आणि पळ काढला.
७ जून रोजी हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून परळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे हे तुकाराम मुंडे हे प्रसिद्ध आयएएस अधिकारी (IAS Tukaram Mundhe) नसून, परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असलेले कंत्राटदार आहेत.


