सर्वात मोठी बातमी! जम्मू- काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला, जम्मू-काश्मीर हादरलं….. परिसरात तणाव..
श्रीनगर | मंडे टु मंडे न्युज | जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करत गोळीबार केला. केल्लम परिसरात झालेल्या या हल्ल्यात छत्तीसगडमधील दीपक या मजुराचा मृत्यू झाला, तर भूपेंद्र कुमार हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी ३ ते ४ राऊंड गोळीबार केला. यात दीपक यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी भूपेंद्र कुमार यांच्यावर अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैन्य, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्त कारवाई करत आहेत.
या हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


