नाले सफाईकडे दुर्लक्ष ; मुसळधार पावसाने धामोडीत पूरस्थिती, नागरिकांचा संताप
धामोडी. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. .दीपक जैन | रावेर तालुक्यातील धामोडी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावालगतच्या नाल्याला मोठा पूर आला असून नाल्याकाठील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे व इतर वस्तू पाण्यात भिजल्याने अनेक कुटुंबांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते दिपक जैन आणि रवी मेढे यांनी ग्रामपंचायतीकडे नालेसफाई तातडीने करण्यात यावी, अन्यथा मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान होऊ शकते, असे निवेदन दिले होते. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यानंतरही नाल्याची प्रभावी साफसफाई करण्यात आली नाही.
नागरिकांचा आरोप आहे की, नाल्यात गाळ, झाडाझुडपे आणि कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडला. मुसळधार पावसानंतर नाल्यातील पाणी वेगाने वाढून ते नाल्याच्या बाहेर आले आणि नाल्याकाठील घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत उभारणे आणि नियमित नालेसफाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
याशिवाय, नाल्याकाठील धोकादायक भागात राहणाऱ्या कुटुंबांचे कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


