साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर आयोजित ‘जागर दुर्गाशक्तीचा’ कार्यक्रमातून कुटुंबव्यवस्था, महिला सन्मान व व्यसनमुक्तीचा जागर
जामनेर,मंडे टु मंडे न्युज || समाजातील वाढत्या कौटुंबिक समस्या, आई-वडील व मुलांमधील संवादाचा अभाव, महिलांचा सन्मान, तरुणाईतील वाढती व्यसनाधीनता आणि ढासळत चाललेली कुटुंबव्यवस्था या महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जागर दुर्गाशक्तीचा’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व युवा व्याख्याते प्रा. वसंत हंकारे सर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व, आई-वडिलांच्या भावनांचा आदर, महिला व मुलींचा सन्मान, पालक आणि पाल्य यांच्यातील सुसंवाद, तरुण पिढीसमोरील आव्हाने तसेच व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती आणि कुटुंबावर होणारे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर या व्याख्यानातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबातील संवाद, परस्पर विश्वास, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. केवळ समस्या मांडणे नव्हे, तर त्यावर सकारात्मक विचार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रा. वसंत हंकारे सर यांचे जामनेर येथे आगमन होणार असून, सायंकाळी ६:०० वाजता जामनेरपुरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे.
या सामाजिक प्रबोधनाच्या उपक्रमाला जामनेर शहरासह परिसरातील नागरिक, माता-भगिनी, युवक-युवती,पालक आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे………साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर


