भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपारोळा

जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; दोन महिला ताब्यात

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || विवाहानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी दोन महिला आरोपींना धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावाजवळून ताब्यात घेतले आहे. विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या कथित मध्यस्थ एजंटचा शोध सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विवाहानंतर घडली धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील (वय ३२) यांचा विवाह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी हिच्यासोबत झाला होता. या विवाहासाठी झारखंड किंवा छत्तीसगड राज्यातून दोन आदिवासी समाजातील महिलांना मध्यस्थामार्फत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहाच्या व्यवहारात अडीच लाख रुपयांची बोली ठरल्याचेही सांगण्यात येत आहे.

जेवणातून विषारी पदार्थ दिल्याचा आरोप

९ ऑक्टोबर रोजी फिर्यादी गणेश ताराचंद पाटील (वय ३४), त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई यांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिला पैसे घेऊन निघून गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. विषबाधेमुळे त्रस्त झालेल्या गणेश यांच्या आई-वडिलांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी पाठलाग करून दोघींना घेतले ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बिट अंमलदार पोलीस हवालदार सुनील हाटकर, पोलीस शिपाई गवळी आणि पोलीस शिपाई शिंदे यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. तपासादरम्यान संबंधित महिला धुळे जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पाठलाग करून गोपनीय माहितीच्या आधारे निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.

मध्यस्थ एजंटचा शोध सुरू

या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२३, ३१६(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.

विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या कथित मध्यस्थ एजंटचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच कथित विवाह व्यवहारामागील नेमके वास्तव काय आहे, याचा तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!