वाहनधारकांसाठी मोठी बातमी : “HSRP” पाटी बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, काय आहे शेवटची तारीख?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना राज्य सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात (HSRP) एचएसआरपी पाटी बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मूदतवाढ देण्यात आलेली आहे. ही शेवटची संधी असून, यानंतर ‘एचएसआरपी’ नसलेल्या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय आहे ‘एचएसआरपी’?
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी डिझाइन केलेली विशेष नंबर प्लेट आहे. २०१९ नंतरच्या नव्या वाहनांना डीलरकडूनच ‘एचएसआरपी’ बसवली जाते, पण जुन्या वाहनांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
या पूर्वी ३० जून २०२५ पर्यंत दुसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आली होती.परंतु आता तिसऱ्यांदा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आतापर्यंत राज्यात सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी फक्त २३ लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात आलं आहे, तर ४० लाख वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, तरीही सव्वा कोटी वाहनं अद्याप ‘एचएसआरपी’च्या कक्षेबाहेर आहेत. अनेक वाहनचालकांनी कंपन्यांकडून ‘एचएसआरपी’ पाट्या मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच, काही फिटमेंट केंद्रे बंद झाल्याने पुरवठा धीमा आहे. या अडचणी लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, ‘एचएसआरपी’ पाट्या तयार करणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा धीम्या गतीने होत असल्याने वाहनचालकांना अडचणी येत आहेत. सरकारने यावर लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी तीन अधिकृत कंपन्यांची निवड केली आहे. वाहनचालकांनी वाहन पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन विभागाने केलं आहे. मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ नुसार, अनधिकृत पाटी वापरणाऱ्यांना १,००० रुपयांचा दंड ठोठावला जाईल. असे परिवहन विभागाने म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

