भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच?

मुंबई,मंडे टु मंडे न्युज | राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगांसमोर मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात सध्या 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 पूर्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, राज्यातील 105 नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2027 मध्ये संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतल्यास, फेब्रुवारी 2027 मध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.


SIRनंतरच निवडणुका?
राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेनंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र ही यादी विधानसभा मतदारसंघनिहाय असेल. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करावी लागणार आहे.

या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या जातील. त्यामुळे मतदार याद्यांचे अंतिमीकरण आणि प्रभागनिहाय विभागणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबरअखेरपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे विलंब
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगांना SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मतदार याद्यांचे अंतिमीकरण, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणे आणि त्यावर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येणार आहे.

त्यामुळे डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता सध्या धूसर आहे. दरम्यान, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही अवलंबून आहे.

फेब्रुवारी 2027 मध्ये एकत्र निवडणुका?
SIRची प्रक्रिया, मतदार याद्यांचे अंतिमीकरण आणि न्यायालयीन बाबी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा पर्याय राज्य निवडणूक आयोगासमोर राहू शकतो. विशेषतः 105 नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2027 मध्ये संपत असल्याने फेब्रुवारी 2027 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र याबाबत अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमावर आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!