भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा स्फोट : शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

‘टक्केवारी’चे गणित पुन्हा एकदा चव्हाट्यावर

जळगाव | मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना तब्बल ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून, विभागाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाचे सुमारे ३८ लाख ४९ हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला १८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. तडजोडीनंतर ही रक्कम १५ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली होती.

धक्कादायक बाब म्हणजे, या १५ लाख रुपयांपैकी ७ लाख ५० हजार रुपये स्वतःसाठी तर उर्वरित ७ लाख ५० हजार रुपये “वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी” असल्याचे बोलले जात असून त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण साखळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारण्याचे शनिवारी (दि. ९ मे २०२६) ठरले होते. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात योगेश अहिरे हे ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. कारवाईनंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. 

या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची वाळवी किती खोलवर रुजली असल्याचे पुन्हा ऐरणीवर आले आहे. भ्रष्टाचाराची वाळवी किती खोलवर रुजली आहे  यापूर्वीही विभागातील विविध कामांमध्ये गैरव्यवहार, टेंडर प्रक्रियेत अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे “बिल मंजुरीसाठी टक्केवारी” हीच विभागातील कार्यपद्धती बनली आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एसीबीने संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून भ्रष्टाचाराची साखळी उघड करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!