पुन्हा लाचखोरी…५० हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्यासह खासगी इसम जाळ्यात! जळगाव जिल्ह्यात खळबळ
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने पाच लाखांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वीच घडले. त्यानंतर आता नशिराबाद भागाचा मंडळ अधिकारी (सर्कल) आणि एका खासगी इसमाला तक्रारदाराकडील प्रलंबित अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने पुन्हा जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली. जळगाव जिल्ह्यात लाचखोरी मध्ये वाढ होताना दिसत आहे.
मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे (३७) आणि खासगी इसम सुरेंद्र प्रल्हाद अहिरे ३९), असे ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या संशयितांची नावे आहेत. पैकी देवरे हे नशिराबाद भागातील मंडळ अधिकारी, वर्ग-३ पदावर कार्यरत आहेत. तर खासगी इसम अहिरे हा व्यापार व्यवसाय करीत असून तो जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरात वास्तव्यास आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शेतीत अवैधरित्या खोदकाम सुरू असल्याबाबत काही स्थानिक रहिवाशांनी तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीची जबाबदारी मंडळ अधिकारी देवरे यांच्याकडे होती. चौकशीदरम्यान संबंधित अर्ज बंद करण्यासह पुढील कारवाई टाळण्यासाठी देवरे यांनी तक्रारदाराकडे सुमारे एक लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. वास्तविक तक्रारदाराविरुद्ध करण्यात आलेले अर्ज नंतर मागे घेण्यात आलेले होते.
तक्रारदाराने याबाबत नाशिक परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता एक लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. संशयितांकडून तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. १२ मे रोजी मंडळ अधिकारी देवरे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम खासगी इसम सुरेश अहिरे याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचून पिंप्राळा येथील तलाठी कार्यालय परिसरात कारवाई केली. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रक्कम तलाठी कार्यालय. पिंप्राळा चे समोर
स्वीकारताच पथकाने खासगी इसमाला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्यात
मिलींद प्रकाश देवरे, वय ३७ वर्षे, मंडळ अधिकारी, वर्ग ३. नेम. नशिराबाद भाग, जळगाव. रा. श्रीनिवास ३५/१ रणछोडदास नगर, जळगांव. आणि खाजगी इसम, सुरेंद्र प्रल्हाद अहिरे, वय ३९ वर्षे, धंदा व्यापार, रा. प्लॉट कांक २८. विद्यानगर, पिंप्राळा, जि. जळगांव यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
सापळा कारवाई सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक. सापळा पथक पोहवा/प्रफुल्ल माळी, पोहबा/बिलास निकम, सर्व नेम ला.प्र.वि. नाशिक. तपासी अधिकारी हेमंत नागरे पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. जळगांव यांनी भारत तांगडे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि., नांशिक परिक्षेत्र, नाशिक.माधव रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. सुनिल दोरगे, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली केली.

