भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर चौपदरीकरण : १०५० शेतकऱ्यांच्या ३४२ हेक्टर शेती क्षेत्रावर भूसंपादन अधिसूचना जारी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनींचे भूसंपादन करण्यास अखेर अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. हा मार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो.

१३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ही अधिसूचना केंद्र शासनाच्या राजपत्रात जाहीर करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यांतील १०५० शेतकऱ्यांच्या मालकीच्या ३४२.७८४ हेक्टर शेती क्षेत्रावर ही अधिसूचना लागू होणार आहे.

मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांच्यामध्ये मोबदल्याच्या दरावरून शेतकऱ्यांची नाराजी आहे. अनेक शेतकरी अद्यापही सरकारकडून योग्य आणि न्याय्य मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रकल्पासाठी या आधीच या प्रकल्पासाठी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाच्या प्रस्तावानुसार संबंधित शेतकऱ्यांकडून वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात रावेर तालुक्यातील सुमारे ५०० ते ५५० शेतकऱ्यांनी आपले आक्षेप आणि हरकती सादर केल्या होत्या. प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने अखेर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिनियम १९५६ च्या कलम ३ (क) अन्वये अंतिम अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांना कायदेशीर मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष भू संपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या परिसरातील जमिनी भूसंपादित होणार
यात वाघोदा, कोचूर, वडगाव, विवरे बु, विवरे खुर्द, रावेर, अजंदे, नांदुरखेडा, तामसवाडी, बोरखेडा, पुनखेडा, पातोंडी, खिरवड, वाघोड, खानापूर, अजनाड व चोरवड ही गावे व त्या परिसरातील जमीन भूसंपादित होणार आहे.

हा महामार्ग महाराष्ट्र – मध्यप्रदेश – गुजरात या तीन राज्यांना जोडणारा महामार्ग असल्याने या महामार्गाच्या चौपदरीकरणा मुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर, जलद व सुरक्षित होणार असून तीन राज्यांतील आर्थिक व व्यापारी संबंध मजबूत होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!