नशिराबाद-उमाळा मार्गावरील भाग्यवर्धन कंपनीच्या सांडपाण्याबाबत नागरिकांमध्ये संताप ; तातडीने कारवाईची मागणी
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ .दीपक लोखंडे | नशिराबाद- उमाळा मार्गालगत कार्यरत असलेल्या भाग्यवर्धन कंपनीमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या कथित प्रदूषित व रासायनिक घटकयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिकांसह पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, याप्रकरणी संबंधित यंत्रणांनी तात्काळ हस्तक्षेप करून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कंपनीमध्ये टाकाऊ साहित्यापासून पुठ्ठा तयार करण्याबरोबरच वापरात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर प्रक्रिया करून प्लास्टिक दाण्याचे उत्पादन केले जाते. या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे सांडपाणी योग्य शुद्धीकरण न करता थेट मोकळ्या जागेत आणि रस्त्यालगत सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कंपनीच्या शेजारील पडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हे दूषित पाणी साचल्याचे सांगितले जात असून, ते रस्त्याच्या कडेला वाहत जाऊन खंडेराव मंदिर परिसरापर्यंत पोहोचत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तक्रारीनंतर काही दिवस परिस्थितीत सुधारणा दिसून येते, मात्र त्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या भागातील शेतजमिनी आणि मोकळ्या रानांमध्ये गुरे चारण्यासाठी जात असल्याने दूषित पाण्याचा परिणाम पशुधनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अशा पाण्याचे सेवन केल्यानंतर काही जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या साचलेल्या पाण्यावर जाळीसदृश थर दिसून येत असून, त्यामध्ये रासायनिक घटकांचा समावेश असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याची भावना परिसरातील रहिवाशांमध्ये वाढत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नशिराबाद नगर परिषद तसेच आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वीही या प्रकरणात चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष तपासणी न होता काहींच्या संगनमतातून विषय दडपला जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.दरम्यान, प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

