अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’: पोलिसांचे छापे, दारू, सट्टा ,जुगाराचे अड्डे उध्वस्त!
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कडक निर्देशांनुसार, शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जळगाव पोलिसांनी एक मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. जळगाव शहर, एमआयडीसी परिसर आणि शिरसोली येथे अवैध सट्टा जुगार व गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला.या धडक कारवाईत एकूण ४३ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन डी वाय एस पी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात एका विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली होती.
या पथकाने बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील ‘मिलन डे’ सट्टा अड्ड्यावर छापा टाकून घनश्याम पाटील व मुकेश मराठे यांना पकडले व ९ हजार ४७० रुपये जप्त केले. पुष्पा पेट्रोल पंपाजवळ ‘टाईम बाजार’ सट्टा चालवणाऱ्या हनिफ सैय्यद व रवींद्र पाटील यांच्याकडून ७ हजार ८० रुपये जप्त करण्यात आले. आर.एल. चौफुली जवळील सट्टा जुगारातून मदानंद शिंदे, शुभम जाधव आणि कैलास खेळवण यांच्याकडून ३ हजार ४९० रुपये हस्तगत केले. तसेच, शिरसोली गावात सट्टा चालवणाऱ्या रवींद्र धनगर याच्याकडून सर्वाधिक १७ हजार १० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
तसेच एमआयडीसी हद्दीत पुष्पा पेट्रोल पंप आणि आर.एल. चौफुली जवळ पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकून सुरेश सपकाळे व विशाल राठोड यांना ६० लिटर दारूसह बेड्या ठोकल्या. पोलिसांनी हे दोन्ही दारूचे अड्डे जागेवरच उद्ध्वस्त केले.
एकूण ३७ हजार ०५० रुपयांची सट्ट्याची रोकड आणि ६ हजार रुपयांची दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत आणि अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा कडक इशारा पोलिसांमार्फत देण्यात आला आहे.ज्या ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण करून हे अवैध धंदे चालवले जात होते, ते सर्व अड्डे पोलिसांनी जागेवरच जमीनदोस्त केले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन DYSP प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात एका विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, आवेश शेख आणि अमोल ठाकूर यांनी अत्यंत गुप्तता बाळगत ही यशस्वी कामगिरी बजावली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

