लेटरहेड, शिक्के आणि इतर बनावट कागदपत्रांच्या आधारे ६३ कोटींचा दावा; दोन वकिलांना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी तब्बल ६३ कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) आणि ॲड. प्रशांत नाना बाविस्कर (रा. पाळधी, ता. जामनेर) या दोन वकिलांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात ६३ कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला. मात्र, या दाव्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि इतर बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एकूण १७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ॲड. किशोर पाटील यांच्याविरुद्ध १७, तर ॲड. प्रशांत बाविस्कर यांच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर २४ जुलै रोजी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील इतर संबंधितांबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे.


