भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बाल कामगार कामावर ठेवले प्रकरणी गुन्हा, ६ बाल कामगारांची सुटका

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात अनेक ठिकाणी बाल कामगारांना कामावर ठेऊन त्यांच्या कडून कामे करून घेतली जातात. असाच प्रकार जळगाव शहरात बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले जात असल्याचा समोर आला आहे. १९ जून गुरुवारी रोजी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरातून सहा बालकामगारांची सुटका करण्यात आली. सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नाणूमल मेघवाणी (वय ५३, रा. गणपती नगर) आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शिनकर (वय ५१, रा. आदर्श नगर) या दोन दुकान मालकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, शहराच्या वेगवेगळ्या भागांत बालकामगारांकडून कमी वेतनात काम करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली.

या तपासणी दरम्यान, फुले मार्केट परिसरातील ‘सागर सुटकेस सेंटर’ या दुकानात चार बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. तसेच, याच परिसरातील ‘ओम ट्रेडिंग’ या किराणा दुकानातही दोन बालकामगार आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही दुकानांतून एकूण सहा बालकामगारांची सुटका केली.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने या संदर्भात जितेंद्र सुभाष पवार (वय ३८, रा. खोटे नगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार, सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नाणूमल मेघवाणी (वय ५३, रा. गणपती नगर) आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शिनकर (वय ५१, रा. आदर्श नगर) या दोघांविरोधात बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!