भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

निष्पाप अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या – निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील साकरी या गावात दिनाक २७ जानेवारी रोजी मन सुन्न करणारी घटना घडली. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन दोन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. ही घटना मंगळवारी घडल्यानंतर सर्वत्र नागरिकांमधून रोष वाढला असून या निष्पाप जीवांच्या आठवणीणाव उजाळा देत या अमानवी घटनेचा तीव्र निषेध करत नराधम आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. विविध महिला संघटना, सामाजिक संस्था व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रपती, मुख्यमंत्री, प्रांत अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाकडे स्वतंत्र व एकत्रित स्वरूपात निवेदने देण्यात आली व आरोपींवर कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दिनाक २७ जानेवारी मंगळवार, रोजी भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घडलेली ही घटना अत्यंत अमानुष, क्रूर व समाजाला हादरवून टाकणारी असल्याचे निवेदनांत नमूद करण्यात आले आहे.निष्पाप अल्पवयीन मुलींना जाणीव पूर्वक विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतल्याची ही घटना केवळ गुन्हा नसून मानवतेवर झालेला आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे महिलांमध्ये, मुलींमध्ये व पालकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील गांधी पुतळ्याजवळ महिला जमा होऊन तेथून महिला प्रांत कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले. मंगळवार रोजी साकरी येथे घडलेली ही घटना अत्यंत अमानुष, क्रूर व समाजाला हादरवून टाकणारी असल्याचे निवेदनांत नमूद आहे. महिलांवरील व मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी महिला मंडळांतर्फे दिलेल्या निवेदनात
करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये जर कठोर शिक्षा झाली नाही तर भविष्यात विकृत प्रवृत्तीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनांमधून संबंधित संशयीत अल्पवयीन असले, तरी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात या प्रकरणात कसलीही ढिलाई न करता सखोल तपास करावा, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. साकरीतील या घटनेमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार निवेदन देणाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. या दोघा अल्पवयीन संशयितांना जळगाव येथील विधीसंघर्ष बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

सकल लेवा महिला मंडळातर्फे नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, अध्यक्षा मंगला पाटील, वैचीशाली धांडे, मनिषा पाटील, मेघा कुरकुरे, वैशाली चौधरी महाजन तसेच भाजपचे उत्तर विभागाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, नगरसेवक किरण कोलते, दीपक धांडे यांनी निवेदन दिले. तसेच प्रतिष्ठा महिला मंडळा तर्फे गांधी पुतळ्यापासून निवेदन देण्यासाठी महिला प्रांताधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, नगरसेविका शारदा धांडे, दीपाली बऱ्हाटे आदी महिलांनी सुद्धा डीवायएसी कार्यालयात जाऊन डीवायएसपी यांना निवेदन देत चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!