भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून लॉकडाऊन संदर्भात मोठी घोषणा : सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत देशाची तयारी, पुरवठा व्यवस्था आणि संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यात आला. बैठक संपल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी मध्यपूर्वेतील घडामोडींवर सविस्तर सादीकरण करत मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचंही पंतप्रधानांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. “आपण सर्वांनी ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्रित काम केलं पाहिजे. तसं केल्यास ही परिस्थितीही यशस्वीपणे हाताळू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमांवरही भर दिला. देशातील आर्थिक आणि व्यापारी स्थिरता कायम राखणे, ऊर्जा सुरक्षेची हमी देणे, नागरिकांचे हित सुरक्षित ठेवणे आणि उद्योग तसेच पुरवठा साखळी मजबूत करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यांना पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्याच्या सूचना देताना, साठेबाजी आणि नफेखोरीविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. कृषी क्षेत्रात आगाऊ नियोजनाची गरज अधोरेखित करत खतांच्या साठवण आणि वितरणावर विशेष लक्ष ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.

तसंच, बदलत्या परिस्थितीला जलद प्रतिसाद देता यावा यासाठी सर्व स्तरांवर मजबूत समन्वय यंत्रणा उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सीमावर्ती आणि किनारपट्टीवरील राज्यांनी जहाजवाहतूक, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सागरी हालचाली यासंदर्भातील आव्हानांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. गैरसमज आणि अफवा पसरू नयेत यासाठी अचूक आणि विश्वासार्ह माहितीच प्रसारित करण्याचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी सतर्कतेचा इशारा दिला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय आणि राज्यांना व्यावसायिक एलपीजीचे वाढीव वाटप याचेही स्वागत करण्यात आले. राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, परिस्थिती स्थिर असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच, ही परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी केंद्रासोबत समन्वयाने काम करण्याची वचनबद्धता त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

२४  मार्च २०२० रोजी जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला होता, तेव्हा देशात कोरोनाचे सुमारे ५००  रुग्ण होते. मात्र, २०२६  मध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारतात सध्या कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असून केवळ ७  सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक कारणास्तव लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. सध्याचे संकट हे आरोग्यविषयक नसून आर्थिक आणि भौगोलिक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, सरकार कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्याच्या विचारात नाही. केवळ युद्धाचे जागतिक परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!