भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

भादली बु. येथे ‘डिजिटल शेती शाळा’; जिल्हाधिकाऱ्यांचा जमिनीवर बसून शेतकऱ्यांशी थेट संवाद

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | भादली बु. (जळगाव) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भादली बु. (जळगाव ) येथे आयोजित ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वेगळाच मान दिला. सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी कोणताही शासकीय बडेजाव न ठेवता शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन घेतले आणि दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच चिया, धने, करडई यांसारख्या पर्यायी व नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीकडे वळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जळगाव जिल्ह्यात कापूस, उडीद, मका, तूर, केळी आदी पिकांसाठी खरीप हंगामात सविस्तर शेतीशाळा आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे, पेरणीपूर्वी उगवण चाचणी करण्याचे, बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. पर्यावरणपूरक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे वापरण्याचाही सल्ला त्यांनी दिला.

‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि समस्यांवर उपाय मिळणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी आगामी खरीप हंगामासाठी गावनिहाय आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले. या आराखड्यानुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास कृषी उपसंचालक भरत इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, तसेच बाजार समितीचे पदाधिकारी व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. परिसरातील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांनी साधेपणाने शेतकऱ्यांमध्ये मिसळून संवाद साधल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाचा हा थेट शेतात येऊन घेतलेला पुढाकार प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!