महाराष्ट्रावर दुहेरी संकट; ताशी ७० किमी वेगाचे वारे आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे,मान्सूनचा जोर वाढणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | दि. ३१ : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील २४ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला असून काही भागांत ताशी ५० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे
उत्तर महाराष्ट्रातही धोक्याचा इशारा
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः विशेषतः उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.नाशिक घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरींसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि नाशिक घाटमाथा रेड अलर्टवर
पुणे व नाशिकच्या घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कोकणात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस
कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत ताशी ५० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर
सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भातही यलो अलर्ट
अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा असली तरी नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


