भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावरावेर

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले; तापीसह नदी-नाल्यांना पूर, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

सावदा, ता. रावेर | मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार, हतनूर धरणात ७१.५२ टक्के एकूण तर ५६.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी २११.९३० मीटरपर्यंत पोहोचल्याने ३२ रेडियल गेट्स १ मीटरने उघडून तापी नदीत सुमारे ७०,०६५ क्युसेक (१९८४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.


दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरण ९५.९१ टक्के भरले असून, गिरणा नदीकाठच्या गावांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुक्ताईनगर येथील कुंड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, काकुडा नदीला पुन्हा पूर आला आहे.


मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यांतील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित झाला आहे. मात्र, पर्यटकांनी धबधब्याजवळ गर्दी न करता सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही जळगाव जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!