मत मोजणीमुळे सावद्यातील रविवारचा आठवडे बाजार सोमवार रोजी
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरात दर रविवारी भरणारा साप्ताहिक आठवडे बाजार एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी शहरातील कायदा-सुव्यवस्था व प्रशासकीय सोयी लक्षात घेता, हा आठवडे बाजार दि. २२ डिसेंबर २०२५ (सोमवार) रोजी भरविण्यात येणार आहे.
मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र/दंडप्र/१/एसाआर/२६६/२०२५ दि.१६/१२/२०२५ या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील साप्ताहिक बाजार इतर सोयीच्या दिवशी आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सावदा शहरातील आठवडे बाजार सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भुषण वर्मा यांनी दिली आहे.
या बदलाबाबत सर्व भाजी विक्रेते, व्यापारी, बाजार मक्तेदार तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

