लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा ; लग्नानंतर गुंगीचं औषध पाजून नवरीसह ९ जण फरार
जामनेर, जि. जळगाव. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जामनेर तालुक्यातील पहूर येथे लग्नाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी अडीच लाख रुपये उकळून अवघ्या चार दिवसांत नवरीने सासरच्यांना गुंगीचे औषध देऊन पलायन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील पायल हरिदास तिजारे (वय २७) हिने “आईला पॅरालिसिस झाला असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे” ‘मी तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे.’ असे सांगून अडीच लाखांची मागणी केली होती. अखेर २ लाख २० हजार रुपयांत व्यवहार ठरला आणि ३० मार्च रोजी पहूर येथील रवींद्र प्रभाकर काळे यांच्याशी तिचा विवाह हिंदू शास्त्रानुसार पार पडला.
शीत पेयात गुंगीचे औषध देऊन पोबारा
लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत, म्हणजेच ३ एप्रिल रोजी मध्यरात्री पायलने पती रवींद्र काळे आणि घरातील इतर पाच सदस्यांना ‘माझा’ या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध दिले. सर्वजण बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत तिने घराला बाहेरून कडी लावली आणि रोकडसह दागिने घेऊन तेथून पोबारा केला.
या आधी पती रवींद्र काळे यांना नवरी मुलगी पायल हिच्या पर्समध्ये जुनी नकली मंगळसूत्राची पोत सापडल्याने, तिचे आधीच लग्न झाले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहूर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल हरिदास तिजारे (नवरी, रा. नागपूर)
तुषार श्रावण पाटील (एजंट, रा. कोल्हे)
राजू प्रकाश माळी (एजंट, रा. कोल्हे)
अजय लोहार (गाडी चालक, रा. कोल्हे)
मिनाबाई संजय टाकारे (रा. संभाजीनगर)
अनिता उर्फ पुष्पा ग्यानिराम दंशरे (रा. भडगाव)
सरला संतोष तोकडे (मावशी, रा. नाशिक)
ज्ञानेश्वर उर्फ नाना राजपूत (मामे भाऊ, रा. कंकराळा)
संभाजीनगर येथील एक अनोळखी महिला या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
