नायगाव येथे गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन; भक्तिमय वातावरणात आरती
नायगाव, ता. मुक्ताईनगर | मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | नायगाव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या आगमनानिमित्त गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मंत्रोच्चार आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आरतीसाठी भाविकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजराने आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील दिवसांत विविध कार्यक्रम पार पडणार असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गणरायाच्या आगमनाने नायगावमध्ये उत्सवाची मंगलमय सुरुवात झाली असून, पुढील दिवसांतही विविध कार्यक्रमांमधून गणेशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे.


