भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी खळबळ ; आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया यांच्यासह अनेकांवर FIR

मुंबई | मंडे टु मंडे न्यूज | दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाला तब्बल सहा वर्षांनंतर नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे एफआयआर दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या एफआयआरमध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, त्यांचा अंगरक्षक, अभिनेता सूरज पांचोली, अभिनेता डिनो मोरिया आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह काही तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालवणी परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू आत्महत्या किंवा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पुढे या प्रकरणाबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आणि दिशाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला गेला.

FIRमध्ये कोणाकोणाची नावे?
समोर आलेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे, त्यांचा बॉडीगार्ड, अभिनेता डिनो मोरिया, अभिनेता सूरज पांचोली, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नावे आरोपी म्हणून नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांवर दबाव आणणे आणि पुरावे नष्ट करण्यासंदर्भात गंभीर आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सहा वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण
आपल्या मुलीच्या मृत्यूचे सत्य समोर यावे आणि न्याय मिळावा, यासाठी सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. आता सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणातील तपासाला अधिकृत आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयच्या विशेष पथकाकडे देण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूची परिस्थिती, त्या रात्री नेमके काय घडले, संबंधित व्यक्तींच्या भूमिका आणि यापूर्वीच्या तपासातील त्रुटी यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

राजकीय वातावरण तापले
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर यापूर्वीही या प्रकरणावरून आरोप करण्यात आले होते. आता एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून आल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एफआयआरमध्ये नाव असणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नव्हे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि संबंधितांची भूमिका सीबीआयच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सीबीआयचा तपास कोणत्या दिशेने जातो, कोणाची चौकशी होते आणि पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!