राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथीय व्यक्ती सोबत अश्लील चित्रफित
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या व्हिडिओनंतर काँग्रेसने नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
यासंबंधीच्या मिळालेल्या वृत्तानुसार, ट्रान्सजेंडर असलेल्या पवन यादव याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
पवन यादव हा ट्रान्सवूमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावाचा आरोप आहे. यासंदर्भात याआधीच पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात दमदाटी व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर, पवन यादव याच्याशी संबंधित प्रकरणात इतर काही मंत्र्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, या कथित व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रकारांमुळे शासकीय निवासस्थानाच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारे शासकीय सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.
