भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तीन बैल जोड्या चोरणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश; तिघांना अटक, सहा बैलांसह ७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा बुद्रुक परिसरातून तीन बैल जोड्या चोरी करणाऱ्या चौकडीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले एकूण सहा बैल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो मॅक्स पिकअप आणि मोटारसायकल असा एकूण ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.


सावखेडा बुद्रुक परिसरातील गोठ्यांमधून दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अलाउद्दीन नबाबत तडवी, गुलशेर बशीर तडवी आणि संजु नबाब तडवी यांच्या मालकीच्या एकूण ९० हजार रुपये किमतीच्या तीन बैल जोड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी तपासासाठी पथक तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान संशयास्पदरीत्या मोटारसायकलवर फिरणारे दोन इसम सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आवेश खान एजाज खान (वय २०, रा. खाजानगर, सावदा) आणि शेख हयात शेख मासुम (वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली देत शेख नासीर शेख चाँद कुरेशी (वय ४२, रा. प्रतिभानगर, वरणगाव) आणि शेख राजीक (रा. रसलपूर, ता. रावेर) यांच्या साथीने बैल चोरी केल्याची माहिती दिली.


आरोपींकडून चोरीस गेलेल्या तीनही बैल जोड्या, म्हणजेच एकूण सहा बैल, असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच आरोपी नासीर शेख चाँद कुरेशी याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (क्र. MH 19 CX 1667) आणि २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 19 ES 6611) जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शेख राजीक याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश फड, पोउपनि राहुल सानप, सफौ जयराम खोडपे, पोहेका निलेश बाविस्कर, मेहरबान तडवी, संजीव चौधरी, अतुल तडवी, पोका संजय तडवी तसेच चालक नामदेव कापडे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!